1
1
1
2
3
नवी दिल्ली | प्रतिनिधी
NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणातील कथित गैरव्यवहार, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेचा अभाव आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा वाढत आहे. या आंदोलनाला नैतिक पाठिंबा देण्यासाठी पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणस्थळी वंचित बहुजन आघाडीचे (VBA) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.

उपोषणस्थळी पोहोचल्यानंतर ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वप्रथम सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी अभिजीत दिपके यांच्यासोबत आंदोलनाची पार्श्वभूमी, विद्यार्थ्यांच्या मागण्या, परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटी आणि पुढील आंदोलनाची दिशा यावर सविस्तर चर्चा केली. आंदोलनात सहभागी विद्यार्थी आणि स्वयंसेवकांशीही त्यांनी संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेतले.
अभिजीत दिपके यांनी सांगितले की, हे आंदोलन केवळ NEET पेपरफुटीपुरते मर्यादित नसून देशातील परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सुरू आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रश्नांवर केंद्र सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांनी आंदोलनाला नैतिक पाठिंबा देत शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवण्याची भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने त्वरित संवाद साधून योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलनांना महत्त्व असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासनाने संवेदनशील भूमिका घ्यावी, असे मत व्यक्त केले. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून प्रश्न मार्गी लावणे ही सरकारची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या या आंदोलनाकडे देशभरातील विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. आंदोलनाला वाढता जनसमर्थन मिळत असून, सरकारने सकारात्मक प्रतिसाद देईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.