1
1
1
2
3
प्रतिनिधी – सुनील हिंगणकर | चिमूर
चिमूर तालुक्यातील नेरी–उसेगाव–सोनेगाव (गां) ते उमा नदी पुलापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी उसेगाव परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास संबंधित विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या रस्त्याचे खडीकरण होऊन तब्बल तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही डांबरीकरणाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नेरी–उसेगाव–सोनेगाव (गां) या मार्गाचा वापर वाघेडा, विहीरगाव, अडेगाव, मदनापूर, पळसगाव आणि पिपर्डा या गावांतील नागरिक नियमितपणे करतात. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असूनही रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून शाळकरी विद्यार्थ्यांना सायकल चालविणेही धोकादायक बनले आहे. तसेच बससेवेलाही याचा फटका बसत असून बसचालकांना मोठ्या अडचणींनी उसेगावपर्यंत बस पोहोचवावी लागत आहे. त्यामुळे या मार्गावर गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर झालेली दुरवस्था ही अवैध वाळू तस्करीमुळे झाली आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक होत असल्याने रस्ता पूर्णपणे उखडला असून सर्वत्र खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि अपघाताचा धोका अधिक वाढतो.
येत्या काही दिवसांत डांबरीकरणाचे काम सुरू झाले नाही तर रस्ता रोको आंदोलन करून संबंधित विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा उसेगाववासीयांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कीर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांना देण्यात आले असून रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या रस्त्याच्या डांबरीकरणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, “आदिवासी विभागाकडे सध्या निधी उपलब्ध नाही. तसेच राज्यभरातही निधीची कमतरता असल्यामुळे या रस्त्याचे काम रखडले आहे,” अशी माहिती समीर उपगंडलावार, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, चिमूर यांनी दिली.