Popular Posts

चिमुरात मुसळधार पावसात विद्यार्थ्यांचे आंदोलन; नीट-टीईटी पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी

चिमूर | प्रतिनिधी

नीट (NEET) आणि टीईटी (TET) परीक्षांतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ चिमूरमध्ये विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी एकत्र येत तीव्र आंदोलन केले. समविचारी विद्यार्थी आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात विविध सामाजिक संघटना, युवक आणि राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

आंदोलनाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. आंदोलकांनी शासनाला निवेदन देत पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

यावेळी रामदास कांबळे, भावना बावनकर, डॉ. आशिष पाटील, डॉ. अजय पिसे, प्रशांत इवते, प्रकाश पोटराजे, प्रशांत कोटे, वैभव ठाकरे, निलेश नाभारे, शुभम मडावी यांच्यासह अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. वक्त्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याबरोबरच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली.

आंदोलन सुरू असतानाच मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र पावसाची तमा न बाळगता विद्यार्थी आणि पालक आंदोलनस्थळी ठामपणे उभे राहिले. पावसातही सुरू राहिलेल्या या आंदोलनाने विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा निर्धार अधोरेखित केला.

आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस निरीक्षक दिनेश लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आंदोलन शांततेत पार पडले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली.

यावेळी वक्त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाचा उल्लेख करत, आंदोलनादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा तसेच आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून अत्याचार होत असल्याचा आरोप केला. अशा प्रकारच्या कारवाईचा निषेध व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला न्याय मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *