1
1
1
2
3
कामानिमित्त जंगल परिसरात गेलेल्या राजेंद्र भोयर यांच्यावर वाघाचा हल्ला; वनविभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
चिमूर | चिमूर तालुक्यातील बरंडघाट परिसरात वाघाच्या हल्ल्यात राजेंद्र तिमाजी भोयर (वय ५० वर्षे) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे बरंडघाटसह आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, जंगलालगतच्या परिसरात वाघाच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र तिमाजी भोयर हे कामानिमित्त बरंडघाट परिसरात गेले होते. याचदरम्यान वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. हल्ला अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली.घटनेची माहिती वनविभाग आणि स्थानिक पोलिसांना देण्यात आल्यानंतर संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेनंतर बरंडघाट आणि आसपासच्या गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः जंगलालगत शेती करणारे शेतकरी, शेतमजूर तसेच जनावरे चारण्यासाठी जंगल परिसरात जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.दरम्यान, वनविभागाने नागरिकांना जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचे आणि विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. मात्र, वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.ग्रामस्थांनी संबंधित वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा, जंगलालगतच्या भागात वनविभागाची गस्त वाढवावी आणि मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.एका कुटुंबाचा आधार हिरावला गेल्यानंतर प्रशासन नेमकी किती तत्परता दाखवणार आणि बरंडघाट परिसरातील नागरिकांना वाघाच्या दहशतीतून कधी मुक्त करणार, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.— विदर्भ व्हॉईस