Popular Posts

सेवानिवृत्तीचा आदर्श उपक्रम : ५८ व्या वाढदिवसानिमित्त ५८ वृक्षांचे रोपण; ‘अंजना होमस्टे’चेही उद्घाटन

चिमूर | प्रतिनिधी

वन विभागात तब्बल २९ वर्षे कर्तव्यनिष्ठपणे सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेले उद्धव बाबुराव लोखंडे यांनी आपल्या सेवापूर्तीचा आनंद एका वेगळ्याच पद्धतीने साजरा करत समाजापुढे पर्यावरण संवर्धनाचा आदर्श ठेवला. वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी ५८ वृक्षांची लागवड करून निसर्गसंवर्धनाचा प्रेरणादायी संदेश दिला.

दि. ४ जुलै रोजी चिमूर येथील मासळ रोड परिसरातील शिवालय पार्क तसेच भानसुली गेट परिसरात आयोजित वृक्षारोपण उपक्रमात विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी के. बी. देऊळकर, वन विभागातील अधिकारी व कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ आणि निसर्गप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

वन विभागातील प्रदीर्घ सेवेदरम्यान जंगल, वनसंपत्ती आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी योगदान दिल्यानंतरही निसर्गाशी असलेले नाते कायम ठेवण्याचा संकल्प श्री. लोखंडे यांनी या उपक्रमातून व्यक्त केला. “सेवानिवृत्ती म्हणजे सेवेला विराम नव्हे, तर समाज आणि पर्यावरणासाठी नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात,” असा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला.

याच दिवशी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या मध्यमवर्गीय पर्यटकांना स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारी निवास व्यवस्था उपलब्ध व्हावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘अंजना होमस्टे’चे उद्घाटन ब्रह्मपुरी वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक महेश बी. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या आईच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या भावनेतून होमस्टेला ‘अंजना’ हे नाव देण्यात आल्याने या उपक्रमाला भावनिक स्पर्श लाभला.

सायंकाळी चिमूर येथील मिलम सभागृहात आयोजित सेवापूर्ती सत्कार समारंभात श्री. उद्धव लोखंडे व सौ. पुष्पा लोखंडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला वन विभागातील अधिकारी, कर्मचारी, माजी सहकारी, नातेवाईक, मित्रपरिवार आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांच्या २९ वर्षांच्या उल्लेखनीय सेवाकार्याचा गौरव करत भावी आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

सेवानिवृत्तीचा आनंद केवळ सत्कारापुरता मर्यादित न ठेवता वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण पर्यटनाला चालना देणाऱ्या उपक्रमांद्वारे समाजापुढे आदर्श निर्माण करणाऱ्या उद्धव लोखंडे यांच्या या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याची चिमूर तालुक्यात विशेष चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *